पुन्हा पुन्हा मन होते माझे...
पुन्हा पुन्हा मन होते माझे, फिरुनी यावे त्या वळणावर,
ज्या रस्त्यावर आहे शाळा, जाऊन यावे त्या वळणावर,
पुन्हा पुन्हा मन होते माझे बसुनी पहावे त्या बाकावर,
ज्या मैत्रीने फुलले बालपण, प्रीत करावी त्या मैत्रीवर ||ध्रु||
दुसरी चा हा वर्ग मोठा, दगडी भिंत अन पत्रा असे,
शेण सड्याच्या त्या वर्गामध्ये बसुनी पहावे पुन्हा पुन्हा,
एक खोली मागे वट हा, उभा नयनी अजुनी असे,
त्या वृक्षाच्या छायेखाली बसून पहावे पुन्हा पुन्हा ||१||
पुन्हा पुन्हा मन होते माझे, फिरुनी यावे त्या वळणावर |
ज्या रस्त्यावर आहे शाळा, जाऊन यावे त्या वळणावर ||
तुडवीत जावी पायवाट ही, वर्ग आठवी चा मनी असे,
भूतकाळातील त्या क्षणांचा, अनुभव घ्यावा पुन्हा पुन्हा,
जमुनी सारी मित्र मंडळी लगबग-लगबग मोठी असे,
जाऊन बसावे शाळेमध्ये, म्हणावी प्रार्थना पुन्हा पुन्हा ||२||
पुन्हा पुन्हा मन होते माझे, फिरुनी यावे त्या वळणावर |
ज्या रस्त्यावर आहे शाळा, जाऊन यावे त्या वळणावर ||
दहावी चा तो वर्ग सकाळी, जाण्याची जरा घाई असे,
धडे गिरवणाऱ्या त्या गुरूंना नयनी भरावे पुन्हा पुन्हा,
मराठीच्या त्या तासाला गोष्टींची मजा ही फार असे,
अभ्यासाच्या गमती-जमती करून पहाव्या पुन्हा पुन्हा, ||३||
पुन्हा पुन्हा मन होते माझे, फिरुनी यावे त्या वळणावर |
ज्या रस्त्यावर आहे शाळा, जाऊन यावे त्या वळणावर ||
ऊंच इमारत, मैदान मोठे पाहून यावे पुन्हा पुन्हा,
अशोकाच्या उंच तरु वरी नजर फिरावी पुन्हा पुन्हा,
शाळेचे ते आंगण भारी वंदूनी यावे पुन्हा पुन्हा,
आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलूनी यावे पुन्हा पुन्हा ||४||
पुन्हा पुन्हा मन होते माझे, फिरुनी यावे त्या वळणावर |
ज्या रस्त्यावर आहे शाळा, जाऊन यावे त्या वळणावर ||
अविरत धडपड ज्या चरणांची पाहून यावे पुन्हा पुन्हा,
गुरु चरण हे थोर निरंतर स्पर्शूनी यावे पुन्हा पुन्हा,
अर्थ जगण्याचा समजुनी घ्यावा, त्यांच्या कडूनी पुन्हा पुन्हा,
गुरु आशीष हा असे हिमालय घेऊन यावा पुन्हा पुन्हा ||५||
पुन्हा पुन्हा मन होते माझे, फिरुनी यावे त्या वळणावर |
ज्या रस्त्यावर आहे शाळा, जाऊन यावे त्या वळणावर ||
प्रा. जनार्दन लक्ष्मण साबळे.
मो. 9921762185
ConversionConversion EmoticonEmoticon