- मराठी काव्य -
नवलाई ची शाळा
==============
नवलाई ची शाळा माझी,
अंगण मोठे इथे दिसे
प्राणी-पक्षी हे सखे सहोदर,
मैफिल त्यांची सदा वसे ||१||
पाम तरुंची हिरवळ दाटे,
तटबंदी ची शक्ती असे,
मुला- मुलातून, फुला-फुलातून,
हित गोष्टीची दृष्टी दिसे ||२||
संस्कारांची घेऊन शिदोरी
वाटचाल ही सदा असे,
दिव्यत्वाच्या कर्ण-भुजांनी,
ज्ञानार्जन हे सिद्ध असे ||३||
येऊन येथे एक असावे,
संस्कारांना जतन करावे,
ऊंच तरू परी आभाळासम
जीवन आपले भव्य असावे ||४||
मैदानातील कौशल्याने
जिद्द आपली जगा दिसावी,
अभ्यासातील जीवन शिक्षण
भविष्यातील दृष्टी असावी ||५||
प्रीति शाळेच्या मैदानातील,
फुलांचा तो सुगंध व्हावे
गगन भरारी घ्यावी आता,
अंबर अवघे फिरुनी यावे ||६||
उच्च आकांक्षा उच्च अपेक्षा,
घेऊन ऊंच गरुड भरारी,
विश्वासाची तुम्हा मिळावी
या मातीतून नवी उभारी ||७||
शिक्षण, मूल्ये जीवन संगे,
मेहनत अंगी सदा असावी,
या मातीचा गौरव व्हावे,
दाही दिशांसी नाव असावे ||८||
लाख मोलाची संधी आहे
जग सारे हे जिंकून घ्यावे,
ज्ञानाच्या या सिंधू मधूनी
अमृत सारे पिऊनी जावे ||९||
जाताना तुम्ही परतून यावे
गंध मातीचा घेऊन जावे,
आदर्शाची द्यावी प्रचिती,
जनसेवेचे ब्रीद असावे ||१०||
*****
लेखन - जनार्दन लक्ष्मण साबळे
लेखन तिथि - 05/02/2026
ConversionConversion EmoticonEmoticon